आधुनिक हिरकणी


शिव कालीन हिरकणी 

झाली इतिहासात अमर,

तिचे ऐकुन दिव्यत्व

फुटे हृदयास पाझर!


काळ गेला बदलले

जरी हिरकणीचे रूप,

मनी वात्सल्यही तेच

परी बुरुजही खूप!


आधुनिक हिरकणीची

लागे प्रतिदिन कसोटी,

घर – ऑफिस तोलण्याची

तिची कसरत मोठी!


पहाटे पासून होते

तिच्या लढाईची सुरवात,

आधी प्रेमाने, लाडाने

मग ओरडत, दटावत!


ऑफिस,शाळा गाठण्याची

सुरू एकत्र तयारी,

माय लेकराची घरातून

धडपडत निघते स्वारी!


धावत पळत जावून

पिल्लास शाळेत सोडते,

“आज वेळेवर येईन”

वेडे वचनही देते!


ओढणी, बॅग सरसावत

लोकलमध्ये झोकुन घेते,

चिरडत, भांडत, लटकत

कशीबशी ऑफिस गाठते!


मीटिंग, प्रेझेंटेशन, टार्गेट

वाढवते कामाचं प्रेशर,

या सर्वामध्ये पडतो

तिला घरचा विसर!


नवनवीन आव्हाहने अन्

जीवघेण्या त्या स्पर्धा,

या सर्वामध्ये नकळत

दिवस मावळतो अर्धा!


लंचब्रेक मध्ये फोनवर

होते विचारपूस धावती,

पिल्लू शाळेतून आल्याची

मनास मिळते पावती!


घड्याळाच्या काट्यावर

तिची भिरभिरते नजर,

इतक्यात नवीन काम

समोर दत्त म्हणून हजर!


भराभर काम उरकण्याचा

तिचा नेहमीचा हेका,

पुढे जाणारा सेकंद

वाढवी काळजाचा ठोका!


घरच्या कॉल्सला कंटाळून

मोबाईल धारातीर्थी पडतो,

सर्व आवरून निघायला

नेहमीचाच उशीर होतो!


कासावीस हिरकणी

घेइ घरट्याकडे धाव,

मनी एकच आसक्ती

आपल्या पिल्लाचाच ठाव!


दमलेल्या माऊलीला दारात

मिळते छोटी मिठी,

चिमुकल्या हातातले होमवर्क

सोबत उभे स्वागतासाठी!


रात्री कुशीत शिरल्यावर

येतो गप्पांना पुर,

मायेची गोधडी पांघरून

जाती स्वप्नदेशी दूर!


वीकेंड, सणवारी मांडते

पेंडींग कामाचा खेळ,

दोन इवुलेसे डोळे

मागती आईचा वेळ!


कर्तव्य, स्वप्नांच्या कोशात

गुरफटून गेली हिरकणी,

पिल्लासाठी वेळ नाही

ही खंत सदैव मनी !


अनुदिन अग्नीपरिक्षा

देई स्त्रीवर्ग तमाम,

अश्या आधुनिक हिरकणीना

आमचा सदैव सलाम!


-सौ. श्रद्धा नाईक













Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अजिंक्यतारा